पुणे, 21 जून : पुणे (Pune) जिल्ह्यातील कामशेत पोलीस स्टेशनच्या (kamshet police station) हद्दीत चोर (Thief) आणि पोलिसांच्या पाठशिवणीचा खेळ पाहण्यास मिळाला. पोलिसांनी चोरांना गाठले, पण चोरांनी गाडी रिव्हर्स घेऊन घटनास्थळावरून सिने स्टाईल पळ काढला. पोलिसांच्या देखतच चोर पळून गेल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
गेल्या महिन्याभरापासून कामशेत परिसरात अनेक चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे व्यापारी तसंच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामसुरक्षा दल तसंच पोलिसांच्या वतीने चोरांचा शोध घेण्यासाठी रात्री गस्त घालण्यात येते. पोलीस वाहनातून संपूर्ण कामशेत ग्रामीण भागात पेट्रोलिंग केले जात असते. रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कामशेत बाजारपेठेजवळ असलेल्या दत्त कॉलनीच्या रस्त्यावर एक संशयास्पद चारचाकी वाहन उभे असून त्यातून पाच ते सहा जण काही शोधाशोध करत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळविली.