
मुंबई, 19 जून: मागील काही दिवसांपासून राज्यात मान्सून चांगलाचं बरसत आहे. राज्यात मान्सूननं आगमन केल्यानंतर गेल्या आठवड्यात दोन-तीन दिवस विश्रांती घेतली होती. त्यानंतर मान्सूननं पुन्हा दिमाखात पुनरागमन केलं आहे. मागील तीन दिवसांपासून मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. परिणामी या जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेली असून कृष्णा आणि पंचगंगा नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
आज रोहा, रायगड, श्रीवर्धन, हर्णे, दापोली, ठाणे आदी भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईला आज मान्सूननं काहीशी विश्रांती दिली आहे. खरंतर मागील आठवड्यापासून मुंबईत पावसाचा लपंडाव सुरू आहे. याठिकाणी कधी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे. तर काही तासात पुन्हा हवामान जैसे थे स्थितीत येत आहे. आज मुंबई शहरात काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला असून पश्चिम आणि पूर्व मुंबई उपनगर परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे.
कोकणात दमदार पावसाची हजेरी
मागील काही दिवसांपासून कोकणात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि नारंगी नदी देखील दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी नदीच्या पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक पुल आणि बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूकसेवा ठप्प झाली आहे. रायगड जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.
तर पुणे जिल्ह्यात पावसानं काही काळ उघडीप दिली आहे. त्यामुळे आज सकाळपासून पुण्यात चांगलं ऊन पडलं आहे. तर जिल्ह्यात काही ठिकाणी मात्र हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला आहे. याशिवाय कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक गांवाना पूर परिस्थितीचा इशारा देण्यात आला आहे.