पुणे, 28 जून: मागील दोन आठवड्यापासून राज्यातून मान्सून (Monsoon in maharashtra) गायब होता. त्यानंतर आता हळुहळू राज्यात मान्सून वापसी होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनच्या सरी कोसळल्या आहेत. तर काही ठिकाणांना पावसानं जोरदार तडाखा दिला आहे. आजही काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र ढगाळ हवामानाची (Cloudy Weather) नोंद करण्यात आली आहे. आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता (Rain) आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आशा पल्लवीत झाल्या आहेत.
आज पालघर, मुंबई, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा हे जिल्हे वगळता आज महाराष्ट्रात सर्व ठिकाणी भारतीय हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. यानंतर आजपासून पुढील तीन दिवस राज्यात पावसाची स्थिती कायम असणार आहे. त्यानंतर पुन्हा दोन दिवस राज्यातून मान्सून गायब होण्याची शक्यता आहे. उद्या मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर महिन्याच्या अखेरच्या दिवशी 30 जून रोजी विदर्भात पावसाची हजेरी लागणार आहे.
Thunderstorm accompanied with lightning moderate to intense spells of rain & gusty winds very likely to occur at isolated places in the districts of Aurangabad,Jalna,Parbhani,Hingoli,Latur,Beed, Osmanabad, Ahmednagar,Nasik,Dhule,Nandurbar, Satara & Sangli during next 3 -4 hrs pic.twitter.com/15OneiXcG3
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 28, 2021
पुढील तीन ते चार तासांत औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, अहमदनगर, नाशिक, धुळे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात आकाशात वीजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांकडून देण्यात आला आहे.
आज पुण्यासह, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांना देखील हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. पण याठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. याठिकाणी आज सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सायंकाळी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.