पुणे, 03 जुलै: मागील तीन आठवड्यांपासून राज्यात पावसाचा खोळंबा झाला आहे. परिणामी राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांना अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला दिमाखात आगमन केलेल्या पावसानं (Monsoon Rain) मागील वीस दिवसांपासून राज्यात दडी मारली आहे. दरम्यानच्या काळात राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहेत. पण राज्यात अजूनही अपेक्षेप्रमाणे मान्सून सक्रिय झाला नाही.
पावसाळ्याचा हंगाम सुरू असूनही मागील 10-12 दिवसात राज्यात खूपच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे चांगल्या पावसासाठी राज्यातील शेतकऱ्यांना आणखी एक आठवडा वाट पाहावी लागणार आहे. आज दक्षिण कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे ढग दाटून आले आहेत. या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यात घाट परिसरात आणि पूर्व विदर्भात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
काय असेल मुंबईची स्थिती?
मागील 10-12 दिवसांत मुंबईत खूपच कमी पाऊस पडला आहे. कुलाबा सांताक्रुझ वेधशाळेनं जारी केलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि उपनगरात मागील 10 दिवसांचा पावसाचा आलेख एकरेषीय राहिला आहे. पहिल्या एक-दोन पावसामुळे हा आलेख किमान सरासरी पावसापेक्षा वरच्या दिशेला आहे. आज मुंबई आणि ठाणे परिसरात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. याठिकाणी जवळपास पावसाची शक्यता नाही.
Colaba Santacruz rainfall curve almost flat since 21Jun 2021, indicating very less rains ovr city in last 10,12 days. Still its above average as on date due to couple of vry heavy spells during onset.
City waiting for its next heavy spell turn, May have to wait for a week plus ! pic.twitter.com/8C3htevIv0
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 3, 2021
दक्षिण कोकण आणि घाट परिसरात आज हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. यानंतर पुढील दोन दिवस राज्यात सर्वत्र कोरडं हवामान असेल. 5, 6 आणि 7 जुलैला मात्र दक्षिण महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.