संजय राऊतांच्या अडचणी वाढणार?, महिलेच्या गंभीर आरोपानंतर हायकोर्टाकडून चौकशीचे आदेश

0
16

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, मुंबईतील हएका महिला मानसोपचार तज्ज्ञांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाहीतर मुंबई हायकोर्टाने यामध्ये हस्तक्षेप करत मुंबई पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाने पोलीस आयुक्तांना यासंदर्भात सविस्तर अहवाल तयार करुन 24 जून रोजी सादर करण्यास सांगितले आहे.

महिलेचा असा आरोप आहे की, संजय राऊत आणि तिच्या पतीच्या सांगण्यावरून काही लोकांनी तिचा पाठलाग करत तिच्यावर अत्याचार केले. महिलेचे वय 36 वर्षे आहे. महिला आपल्या पतीपासून विभक्त राहते. या प्रकरणी न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांच्या खंडपीठाने पोलीस आयुक्तांना याबाबत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

‘संजय राऊत गेली सात वर्षे त्रास देत आहेत’

संजय राऊत गेली सात वर्षे महिलेला त्रास देत असून तिला जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली असाही आरोप महिलेने केला आहे. काही लोक तिच्या मागावर लावले आहेत. व्यवसायाने मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या या महिलेने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेत मुंबई पोलिसांनाही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यामुळेच मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना थेट यासंदर्भात अहवाल तयार करून कोर्टासमोर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अहवाल सादर करण्याची तारीख 24 जून निश्चित करण्यात आली आहे.

भाजप नेते निलेश राणेंकडून टीका

कोर्टाच्या आदेशानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, कोर्टाने दिलेल्या आदेशाची बातमी जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध करुन दिली पाहिजे. दोन आठवड्यांपूर्वी या महिलेला विनाकारण अटक करण्यात आली होती. त्यांच्या या आरोपानंतर आता पुढे या प्रकरणात काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Source link