Sharad Pawar Reaction On Ed Raid At Anil Deshmukh House – अनिल देशमुखांच्या घरी ईडीचे छापे; शरद पवार म्हणाले… | Maharashtra Times

0
19


हायलाइट्स:

  • माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी ईडीचे छापे
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली प्रतिक्रिया
  • ईडीच्या छाप्यांची आम्हाला यत्किंचितही चिंता वाटत नाही – पवार

पुणे: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या मुंबई व नागपूर येथील घरी आज पडलेल्या ईडीच्या छाप्यांची आज दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतेक नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपूर येथे ईडीच्या विरोधात निदर्शनंही केली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील नव्या पक्ष कार्यालयास शरद पवार यांनी आज भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘ईडीनं अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या कारवाईत नवीन काहीच नाही. अशी कारवाई होणारे ते पहिले नाहीत. मुळात ईडी वगैरे यंत्रणा आमच्यासाठी नवीन नाहीत. याआधीही अनेकांबाबत केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर झाला आहे. या छाप्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही. यापूर्वीही अनिल देशमुख यांची केंद्रीय तपास‌ यंत्रणांनी चौकशी केली आहे. त्यांच्या मुलाच्या व्यवसायाचीही चौकशी झाली आहे. त्यात त्यांच्या हाती काही लागले नाही. आताही काही लागणार नाही. त्यामुळं आम्हाला याबाबत अजिबात चिंता वाटत नाही,’ असं शरद पवार म्हणाले.

वाचा: करोना निर्बंध आणखी वाढणार; राज्य सरकारचे नवे आदेश

पवार यांनी यावेळी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘जो विचार आपल्याला मान्य नाही, तो विचार दडपण्याचा प्रयत्न ईडी सारख्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून होत आहे. हे अनेक राज्यात होत आहे. केंद्राची सत्ता यांच्या हातात आल्यापासून हे सगळं सुरू आहे. लोकांनीही ते माहीत असून ते सुद्धा त्याची गांभीर्याने नोंद घेत नाहीत, असंही पवार म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांना टोला

अँटिलिया प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे याने केलेल्या आरोपांवरून अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याच ठराव भाजपच्या राज्य कार्यकारिणीत गुरुवारी करण्यात आला होता. त्याबाबतही पवार यांनी भाष्य केलं. ‘ठराव करून चौकशीची मागणी करण्याची ही पहिलीच घटना आहे. चंद्रकांत पाटील हे मोठे कर्तृत्वान गृहस्थ आहेत. यापूर्वी कधीही झाल्या नाहीत, अशा गोष्टी करण्यात त्यांचा लौकिक आहे. त्यांच्या पुढाकारानं असं काही झालं असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही,’ असा चिमटा पवारांनी काढला.Source link