Covovax Vaccine: कोवोवॅक्स लसीचं उत्पादन सुरु, पहिल्या बॅचच्या निर्मितीला सुरुवात, Serumकडून ट्वीट

0
16

पुणे : अमेरिकेतील बायोटेक कंपनी Novavax आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या भागिदारीतून तयार करण्यात येणाऱ्या Covovax या कोरोना लसीच्या उत्पादनाची सुरुवात झाली आहे. याबाबत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं ट्वीट करत माहिती दिली आहे. ‘हा एक माईलस्टोन आहे. या आठवड्यात आम्ही पुण्यातील कंपनीत कोवोवॅक्सची पहिली बॅच सुरू केली’, असं ट्वीट सीरमकडून करण्यात आलं आहे. या ट्वीटसोबत सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी बॅचसह एक फोटो देखील टाकला आहे.

ही लस कोरोनाच्या ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका व्हेरिएन्ट विरोधात 89 टक्के कार्यक्षम असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. सप्टेंबर 2021 पर्यंत ही कोरोना प्रतिबंधक लस बाजारात येण्याची शक्यता आहे अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी याआधीच दिली होती.

जानेवारी महिन्यात Novavax या लसीची चाचणी ही आफ्रिकेतील 245 कोरोना रुग्णांवर करण्यात आली होती.  हे सर्व रुग्ण एचआयव्ही पॉझिटिव्ह होते. त्यांना या लसीचा डोस देण्यात आल्यानंतर असं लक्षात आलं की ही लस 48.6 टक्के प्रभावी आहे. त्यानंतर या लसीची ट्रायल ही ब्रिटनमधील 18 ते 84 वयाच्या 15,000 कोरोना रुग्णांवर करण्यात आली. त्यामध्ये 27 टक्के रुग्ण हे 65 वर्षांवरील होते. त्यावेळी आलेल्या परिणामातून असं लक्षात आलं की, कोरोनाच्या मूळच्या स्ट्रेन विरोधात ही लस 96.4 टक्के प्रभावी ठरली तर ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनविरोधात ती 86.3 टक्के प्रभावी ठरल्याचं दिसून आलं आहे.

भारताने आता देशांतर्गत कोरोना लसीचा तुटवडा जाणवू नये म्हणून आपल्या शेजारील राष्ट्रांना आणि आफ्रिकेतील, युरोपातील देशांना करण्यात येणाऱ्या कोरोना लसीच्या निर्यातीवर काही कालावधीसाठी बंदी आणली आहे. अशातच आता सीरम इन्स्टिट्यूट आणि नोव्होवॅक्स यांच्या भागिदारीतून निर्माण करण्यात येणाऱ्या कोवोव्हॅक्स या लसीच्या उत्पादनाची भारतात सुरुवात झाल्याने दिलासा मिळाला आहे. ही लस येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात येणार असल्याचं अदर पुनावाला यांनी सांगितलं होतं.

Source link