अजबच! भुकेलेल्या सापाने गिळली सव्वा किलोची कोंबडी

0
28

 सोलापूर (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन

भुकेने व्याकूळ झालेल्या व भक्ष्याच्या शोधात पोल्ट्री फार्ममध्ये घुसलेल्या साडे तीन फूट नागाने चक्क सव्वा किलोची कोंबडी गिळल्याची घटना सोलापूर नजीकच्या खेडे या गावात घडली आहे. पोल्ट्रीफार्ममध्ये घुसून सापाने अंडी व कोंबडीची पिल्ले खाण्याच्या घटना अनेकदा घडलेल्या आहेत, पण चक्क मोठी कोंबडी खातानाचा प्रकार पहिल्यादाच घडल्याचे दिसून आले आहे.

वाचा: निदान तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं, चंद्रकांत पाटलांचा खडसेंना टोला

बार्शी रोडवरील खेड पाटी येथील रहिवासी सोमनाथ तांदळे हे त्यांच्या पोल्ट्रीफार्ममध्ये सायंकाळी पावणे आठच्या सुमारास नियमितपणे कोंबड्यांना खाद्य टाकण्यासाठी गेले असता त्यांना एक साप कोंबडीला मारून गिळत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वाईल्ड लाईफ कॉझर्वेशन सर्कलच्या सुरेश क्षीरसागर यांना फोनवर समोर दिसणाऱ्या दृश्याबद्दलची माहिती दिली. त्यावेळी सुरेश क्षीरसागर व चंद्रशेखर धनशेट्टी यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता पोल्ट्रीफार्ममध्ये कोंबड्याना अंडी घालण्यासाठी ठेवलेल्या डेऱ्यांच्या बाजूला साधारण साडेतीन फूट लांबीचा नाग प्रजातीचा विषारी साप एक जिवंत कोंबडी गिळत असल्याचे दिसून आले. तेव्हा क्षीरसागर यांनी त्यांच्या नैसर्गिक प्रकियेत व्यत्यय न आणता आडबाजूला बसून त्याचे निरीक्षण करत ही घटना मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केली.

सापाने त्या कोंबडीला तिच्या मानेपर्यत गिळले होते पण हे भक्ष्य मोठे आहे हे त्या सापाच्या लक्षात आल्यानंतर त्याने त्या कोंबडीला तोंडातून सोडले आणि पळ काढण्याचा प्रयत्न केला असता सर्पमित्रांनी त्याला सुरक्षितपणे एका पी.व्ही.सी. पाईपमध्ये बंद केले. त्यानंतर त्या नागाला तांदळे यांच्या हस्तेच साधारणपणे दोनशे मीटर अंतरावर नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. यावेळी भक्ष्यस्थानी पडलेल्या त्या कोंबडीचे वजन केले असता ती सव्वा किलोची असल्याचे स्पष्ट झाले. पोल्ट्रीफार्म चालक तांदळे यांनी प्रसंगावधान राखून सापाला वाचविण्यास प्राधान्य दिले. याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.

Source link