नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)चे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीमध्ये आहेत. आज त्यांनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली. उद्या शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मंत्री नवाब मलिकांनी दिली आहे. या बैठकीला 15 ते 20 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक उद्या मंगळवारी दिल्लीत होणार आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. या बैठकीला सर्व निमंत्रित सदस्य आणि परमनंट सदस्य सहभागी होणार आहेत. या बैठकीत विविध अजेंड्यावर चर्चा होणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

दरम्यान या बैठकीनंतर शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत असेही नवाब मलिक म्हणाले.

नवाब मलिक म्हणाले की, आगामी लोकसभेच्या अधिवेशनाबाबत यामध्ये चर्चा होणार आहे. शिवाय देशातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली जाणार आहे. संपूर्ण देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम उद्यापासून शरद पवार हे करणार असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईत पवार यांची भेट घेतली होती आणि आज दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असून या भेटीत त्यांनी देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती त्यांच्याकडे जी उपलब्ध होती ती दिल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.उद्या मोजक्या पक्षांसोबत चर्चा होणार असून त्यानंतर हळूहळू इतर पक्षांना कसं एकत्र आणता येईल त्याबाबतीत हे नेते बसून ठरवणार आहेत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

Source link