बंगालमध्ये भाजपच्या ४० कार्यकर्त्यांची हत्या; सुवेंदू अधिकारींनी मोदी – शहांना भेटून दिली भयानक परिस्थितीची माहिती

0
70

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन

पश्चिम बंगाल जिंकल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आता देशाचे नेतृत्व करायची स्वप्ने पडत असताना खुद्द बंगालमध्ये मात्र राजकीय हिंसाचाराचे थैमान सुरू आहे.

या हिंसाचाराची माहिती देण्यासाठी बंगालमधले भाजपचे नेते आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी नवी दिल्लीत भेटीगाठींचा सिलसिला चालविला आहे. काल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तर आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले होते.

बंगालमधल्या हिंसाचाराबद्दल बोलताना ते म्हणाले, की राज्यात राजकीय हिंसाचाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या ४० कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. राज्य सरकार हा हिंसाचार थांबविण्याऐवजी त्याला चिथावणीच देत आहे. ही सर्व परिस्थिती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटून सांगितली आहे. बंगालमध्ये भाजप संघर्ष करीत राहील. त्यात खंड पडणार नाही.

सुवेंदू अधिकारींच्या दिल्ली वारीवरून तृणमूळ काँग्रेसने मात्र जोरदार टीकास्त्र सोडले असून अधिकारींची दिल्लीवारी आणि नेत्यांच्या भेटीगाठी स्वतःला भ्रष्टाचाऱाच्या वेगवेगळ्या केसेसमधून सोडविण्यासाठी होत्या. त्याचा बंगालच्या हिंसाचाराशी किंवा बंगाली जनतेशी काहीही संबंध नाही, अशी टीका तृणमूळ काँग्रेसने केली आहे.