thackeray government publicity campaign news: Thackeray Government: ठाकरे सरकारची प्रसिद्धीत आघाडी; १६ महिन्यांत तब्बल १५५ कोटी खर्च – thackeray government spent rs 155 crore on publicity campaigns in 16 months

0
14


हायलाइट्स:

  • ठाकरे सरकारचा १६ महिन्यांत प्रसिद्धीवर १५५ कोटी खर्च.
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिली माहिती.
  • नेमकी कशाची व कुणाची प्रसिद्धी चाललीय?: फडणवीस

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने गेल्या १६ महिन्यांच्या कालावधीत प्रसिद्धीवर तब्बल १५५ कोटी रुपये खर्च केल्याची बाब समोर आली आहे. यात सोशल मीडियावर जवळपास ५.९९ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून दर महिन्याला प्रसिद्धीवर साधारण ९.६ कोटी रुपये खर्च होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. ( Thackeray Government Publicity Campaign News )

वाचा: शिवसेना-भाजप पुन्हा मैत्री होणार का?; फडणवीसांनी केलं ‘हे’ मोठं विधान

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे याबाबत अर्ज केला होता. महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून आतापर्यंत प्रसिद्धीवर किती खर्च केला याचा तपशील त्यांनी मागितला होता. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने गलगली यांच्या अर्जावर उत्तर देताना त्यात ११ डिसेंबर २०१९ पासून १२ मार्च २०२१ पर्यंतचा प्रसिद्धीवरील खर्चाचा तपशील उपलब्ध करून दिला आहे. यात २०१९ या वर्षात २०.३१ कोटी रुपये खर्च झाले आहेत तर लसीकरणाच्या अनुषंगाने प्रचारावर सर्वाधिक १९.९२ कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

वाचा: ठाकरे सरकारने लोकशाहीला कुलूप ठोकले; फडणवीसांचा गंभीर आरोप

वर्ष २०२० मध्ये एकूण २६ विभागांच्या प्रसिद्धीवर १०४.५५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यात महिला दिनानिमित्त प्रसिद्धी मोहिमेवर ५.९६ कोटी खर्च करण्यात आला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानावर १९.९२ कोटी, विशेष प्रसिद्धी मोहिमेवर ४ टप्प्यांत २२.६५ कोटी खर्च झाला आहे. यात १.१५ कोटींचा खर्च सोशल मीडियावर दाखवला आहे. महाराष्ट्र नागरी विकास अभियानावर ३ टप्प्यात ६.४९ कोटी खर्च करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने निसर्ग चक्रीवादळावेळी ९.४२ कोटी खर्च केले असून यात २.२५ कोटींचा खर्च सोशल मीडियावर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. राज्य वैद्यकीय शिक्षण विभागाने १८.६३ कोटी खर्च केले असून शिव भोजन योजनेच्या प्रसिद्धीवर २०.६५ लाख खर्च झाला आहे. त्यात ५ लाखांचा खर्च सोशल मीडियावर झाला आहे. वर्ष २०२१ मध्ये १२ विभागांनी प्रसिद्धीवर २९.७९ कोटींचा खर्च १२ मार्च २०२१ पर्यंत केला आहे. यात वैद्यकीय शिक्षण विभागाने १५.९४ कोटी खर्च केले आहेत तर जल जीवन मिशनच्या प्रसिद्धीवर १.८८ कोटी खर्च करण्यात आले आहेत. ४५ लाख रुपये खर्च सोशल मीडियावर करण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाने २.४५ कोटींच्या खर्चात २० लाख रुपये सोशल मीडियासाठी खर्च केले आहेत. अल्पसंख्याक विभागाने ५० लाखांपैकी ४८ लाख रुपये सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी खर्च केले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने ३.१५ कोटींच्या खर्चात ७५ लाख रुपये सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी वापरले आहेत. या माहितीच्या आधारे गलगली यांनी एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं असून सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या नावाखाली झालेल्या खर्चावर त्यांनी शंका घेतली आहे. विभाग स्तरावर केलेला खर्च, खर्चाचे स्वरूप आणि अन्य तपशील शासनाने संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वाचा: मुंबई: धारावीत आज करोनाचा एकही नवा रुग्ण नाही; ‘असा’ दिला लढा

नेमकी कशाची प्रसिद्धी हे कळू द्या: फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आमच्या सरकारच्या काळात प्रसिद्धीसाठीचं बजेट २६ कोटी इतकं होतं ते या सरकारने २४६ कोटी केलं आहे, असे नमूद करत फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केले. सध्या सगळीच कामं बंद आहेत. यांनी नवीन असं काहीच सुरू केलेलं नाही. त्यामुळे नेमकी कशाची प्रसिद्धी सुरू आहे आणि कुणाची प्रसिद्धी केली जात आहे, याची माहिती आम्हाला मिळायला हवी. सोबतच तिन्ही पक्षांच्या कोणत्या कोणत्या नेत्यांच्या प्रसिद्धीसाठी किती पैसे खर्च झाले, याचा तपशीलही मिळायला हवा, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

वाचा: राज्यात करोना रिकव्हरी रेट पुन्हा घसरला; ‘हे’ आकडे चिंता वाढवणारेSource link