Twitter vs Indian Govt : ट्विटरकडून भारताच्या नकाशासोबत पुन्हा छेडछाड, सरकारकडून कठोर कारवाईचे संकेत

0
40

नवी दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने पुन्हा एकदा भारताचा चुकीचा नकाशा दाखवला आहे. आपल्या वेबसाईटवर ट्विटरने जगाचा नकाशा जारी केला असून त्यात जम्मू-काश्मीर आणि लडाख वेगवेगळे देश असल्याचं दाखवलं आहे. म्हणजेच ट्विटरच्या मते जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचे भाग नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून ट्विटर विरुद्ध केंद्र सरकार अशा वादाची मालिका सुरु आहे. त्यातच आता भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याचा आरोप होत आहे. एका ट्विटर युझरने ही बाब समोर आणली आहे. ट्विटरच्या करिअर पेजवर गेल्यावर त्यावर दिसणाऱ्या नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारतापासून विभक्त दाखवण्यात आले आहेत. यानंतर अनेक नेटिझन्सनी विविध सरकारी हॅण्डलला मेंशन करुन ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.

मागील वर्षीही ट्विटरने भारताच्या नकाशासोबत छेडछाड केली होती. ट्विटरविरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. याआधी 12 नोव्हेंबर रोजी सरकारने लेहला केंद्रशासित प्रदेश लडाखच्या ऐवजी जम्मू काश्मीरचा भाग दाखवल्याप्रकरणी ट्विटरला नोटीस जारी केली होती.

दरम्यान बातमी लिहीपर्यंत भारत सरकारकडून ट्विटरला कोणतीही नोटीस पाठवलेली नव्हती. सरकारने ट्विटरला नोटीस पाठवली आणि त्यानंतरही ट्विटरने दुरुस्ती केली नाही तर आयटी कायद्याच्या कलम 69 अ अंतर्गत ट्विटरवर कारवाई केली जाऊ शकते.

Source link