दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू; शेळीला वाचवण्यासाठी उडी मारली आणि…

0
25

अहमदनगर :संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर शिवारात दगड खाणीतल्या विहिरीतील पाण्यात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला असून हे दोघे सख्खे भाऊ होते. समाधान जालिंदर भडांगे ( वय १२) व सुरेश जालिंदर भडांगे ( वय १०) अशी मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. या घटनेने कौठेकमळेश्वर गावावर शोककळा पसरली आहे. ( Two Brothers Drowned in Sangamner )

कौठेकमळेश्वर ते निळवंडे रस्त्यानजीकच्या खिंड शिवारात दगड खाण आहे. समाधान जालिंदर भडांगे व सुरेश जालिंदर भडांगे ही भावंडे शेळ्यांना खाणीकडे घेऊन गेले होते. एक शेळी पाण्यात पडल्याने तिला वाचविण्यासाठी समाधान भडांगे हा पाण्यात उतरला असता तो पाण्यात बुडाला. भाऊ पाण्यात बुडाल्याचे बघून त्याला वाचविण्यासाठी सुरेश भडांगे हा चिमुकला पाण्यात उतरला असता दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोबत असलेल्या काही मुलांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी कौठेकमळेश्वर गावात घटनेची माहिती दिली. त्यानंतर उपसरपंच नवनाथ जोंधळे सहित पदाधिकारी व ग्रामस्थांनी खाणीकडे धाव घेतली.

घटनेची माहिती समजताच पोलीस पाटील नानासाहेब सुपेकर यांनी घटनास्थळी जावून माहिती घेत घटनेची खात्री केली व संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास माहिती दिली. पदाधिकारी व ग्रामस्थांनी पाण्यातून दोघाही मुलांचे मृतदेह बाहेर काढले व घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविले. समाधान भडांगे हा पाचवीत, तर सुरेश भडांगे हा तिसरीत शिकत होता.

Source link