Weather : राज्यात मान्सूनपूर्व बरसण्यास सुरुवात, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, पुढचे दोन दिवस इशारा | Aurangabad

0
15


Weather : राज्यात मान्सूनपूर्व बरसण्यास सुरुवात, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, पुढचे दोन दिवस इशारा

Maharashtra weather forecast : राज्यात पुढचे दोन दिवस बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे दोन दिवस संपूर्ण राज्यामध्ये तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबई, 03 जून : सर्वांना प्रतिक्षा असलेल्या मान्सून (Monsoon) देशात दाखल झाला आहे त्याचबरोबर राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाला (Premonsoon) सुरुवात झाली आहे. गुरुवारी प्रामुख्यानं, पश्चिम महाराष्ट्रासह (West Maharashtra) काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. तर पुढचे दोन दिवस म्हणजे शुक्रवार आणि शनिवारी राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा (Rain Forecast) देण्यात आला आहे.  (Maharashtra weather forecast)

(वाचा-monsoon 2021: मान्सून कमिंग सून, केरळात झाला दाखल)

गुरुवारी पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि प्रामुख्यानं कोल्हापुरात जोरदार पाऊस झाला. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर सांगलीमध्येही काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. मिरजमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळं अनेक भागांमध्ये पाणीही साचलं होतं. मराठवाड्यातही काही भागांत पाऊस झाला. मात्र मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या पावसाच्या तुलनेत पावसाचं प्रमाण अत्यंत कमी होतं.

(वाचा-राज्यातील 18 जिल्हे अनलॉक होणार? वडेट्टीवारांच्या स्पष्टीकरणानंतरही गोंधळ कायम)

पुण्यामद्ये प्रामुख्यानं नीरा नदी आणि वीर धरण क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. याठिकाणी जोरदार पावसासह वादळी वारेही पाहायला मिळाले. मुंबईत बुधवारी काही भागांमध्ये झालेल्या चांगल्या पावसानंतर गुरुवारी मात्र तुरळक भागांत पाऊस झाला. शुक्रवारीही पुणे आणि मुंबईमध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी मध्यम आणि तीव्र स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान रत्नागिरीमध्ये 04 जून व 05 जून काही ठिकाणी वीजांच्या गडगटासह ताशी 30-40 कि.मी. वाऱ्यासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांना सावधानता व सुरक्षिततेचा बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. त्याचबरोबर राज्यात पुढचे दोन दिवस बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे दोन दिवस संपूर्ण राज्यामध्ये तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


Published by:
News18 Desk


First published:
June 3, 2021, 8:51 PM ISTSource link