शासननामा न्यूज ऑनलाईन
महाराष्ट्र भूषण, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे, मात्र हे पत्र बनावट असल्याचे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रवक्ते तथा डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप पाटील यांनी स्पष्ट केले आहे. असे कुठलेही पत्र आप्पासाहेबांच्या वतीने जारी करण्यात आले नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. कोणीतरी खोडसाळपणा करून यापूर्वी आप्पासाहेबांनी काढलेल्या पत्राचा वापर करीत मूळ मजकुरात फेरफार करीत हे पत्र तयार केले आहे, असे पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणादरम्यान श्री सदस्यांच्या उष्माघाताने झालेल्या मृत्यूमुळे राजकारण तापले असतानाच, शनिवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र समाज माध्यमांवर प्रसारित झाले. ज्यात राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले गेले होते. शासनाने दिलेला पुरस्कार परत करणार असल्याचेही नमूद करण्यात आले होते. माझ्या अनुयायांचा मतांसाठी वापर केला. माझ्या साधकांसाठी मंडप टाकला नाही. झालेल्या घटनेची पूर्ण जबाबदारी घेऊन मी श्री सेवकांची माफी मागतो. माझ्या सर्व श्री सेवकांना मी आवाहन करतो की यापुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका, असे बनावट पत्रात नमूद करण्यात आले होते..
दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.