कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार की नाही याकडे अनेकांचं लक्ष आहे. आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील भाष्य केलंय. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरातील निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासंदर्भात मंत्रालयस्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी, असे निर्देशगी अजित पवारांनी दिले. ते पुणे विधानभवनाच्या सभागृहात जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठकीच बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेता पुणे व पिंपरी चिंचवड महानगरांसह ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी. व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन प्रणाली व आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ आदींसह उपचार सुविधांचा सातत्याने आढावा घेण्यात यावा. तसेच ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेली धडक सर्वेक्षण व नमुना तपासणी मोहीम अधिक गतीमान करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.”
पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनेबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.