मुंबई : कोकणावर निसर्गाने केलेल्या वक्रदृष्टीने अनेकांचे होत्याचे नव्हते झाले. तळिये गाव तर डोंगराखाली गाडले गेले. याच गावाचा दौरा करण्यासाठी सध्या राजकीय पक्ष तिथे जात आहेत. याच मुद्दयावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्या कलगीतुरा रंगत आहे. संजय राऊतांनी विरोधकांवर केलेल्या टीकेला सध्या नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पूरग्रस्त भागात राजकीय पर्यटन नको, असे राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. तसेच शिवेसेनेने ही आजच्या ‘सामना’मधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर निशाणा साधलाय. “केंद्रीय मंत्री दुर्घटनाग्रस्त स्थळी ‘पर्यटन’ करण्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात येतात व मुख्यमंत्री, सरकारी यंत्रणांवर लाखोली वाहून निघून जातात हे कसलं लक्षण समजायचं?”, असं म्हणत शिवसेनेनं राणे यांच्यावरही निशाणा साधला आहे. मात्र आता या टीकेला राणेंनीही उत्तर दिलं आहे.
जनता आता समोर येऊन राग व्यक्त करु लागल्यामुळे शिवसेना हादरुन गेली व त्यामुळेच सामना मध्ये एकाच विषयावर लागोपाठ दोन दिवस अग्रलेखातून जळफळाट झाला. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि लोकहित जोपासणे याचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहिलेला नाही हेच यावरुन सिध्द होते.
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 27, 2021
राणेंनी ट्विटरवरुन दोन ट्विट केली आहेत. पहिल्या ट्विटमध्ये राणेंनी, “जनता आता समोर येऊन राग व्यक्त करु लागल्यामुळे शिवसेना हादरुन गेली व त्यामुळेच ‘सामना’मध्ये एकाच विषयावर लागोपाठ दोन दिवस अग्रलेखातून जळफळाट झाला. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि लोकहित जोपासणे याचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहिलेला नाही हेच यावरुन सिध्द होते,” असा टोला लगावला आहे.
तर दुसऱ्या ट्विटमध्ये, “लोकांच्या संकटाचे राजकारण आम्ही करत नाही. मोटार चालविण्याचे कौतुकही करुन घेत नाही. अशा प्रसंगी तळी उचलण्याची सवयच असलेल्याना तळी उचलू द्या आम्ही लोकांची सेवा करू,” असा टोला लगावला आहे. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत पंढरपूरला गेल्याच्या पार्श्वभूमीवर हा टोला राणेंनी लगावलाय.
[ad_2]