मुंबई – जगभरासह भारतामध्ये देखील करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु आहे. एकीकडे लसीकरण मोहिमेने वेग घेतला असतानाच दुसरीकडे मात्र लसीच्या परिणामकारकतेबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. करोना प्रतिबंधक लसी विषाणूच्या नव्या अवतारावर परिणामकारक ठरतील का याबाबत तज्ज्ञांमध्ये देखील मतभिन्नता असल्याचं दिसतंय. अशातच करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर देखील मुंबई येथील एका महिला डॉक्टरला विषाणूची एकदा नव्हे तर दोनदा बाधा झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.
मुंबई येथील वीर सावरकर रुग्णालयात कोव्हीड रुग्ण विभागात कार्यरत असलेल्या श्रुष्टि हिलारी या २६ वर्षीय डॉक्टरला आतापर्यंत एकूण तीन वेळा विषाणू बाधा झाली आहे. विशेष म्हणजे करोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर देखील त्यांना दोनदा विषाणूची बाधा झाली आहे.
श्रुष्टि यांना गतवर्षी जून महिन्यामध्ये प्रथम करोना विषाणूची बाधा झाली होती. यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांसह ८ मार्चला करोना लसीचा (कोव्हीशील्ड) पहिला डोस घेतला. यानंतर २९ एप्रिलला लसीचा दुसरा डोस घेतला.
मात्र यानंतर श्रुष्टि यांना २९ मे ला दुसऱ्यांदा करोनाची बाधा झाली. त्यावेळी त्यांनी घरीच उपचार घेत करोनावर मात केली. मात्र ११ जुलै रोजी त्या पुन्हा एकदा करोना पॉझिटिव्ह आल्या. यावेळी त्यांचे आई, वडील व भाऊ यांनाही विषाणूची बाधा झाली. विशेष म्हणजे करोना झालेल्या सर्वांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते.
डॉक्टर श्रुष्टि व त्यांच्या कुटुंबियांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांना रेमडीसीव्हीर देण्यात येत आहे. डॉक्टर व त्यांच्या भावाचे नमुने त्यांना बाधित करणारा विषाणूचा व्हॅरियंट कोणता आहे याबाबतच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
तज्ज्ञांच्या मते करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही विषाणूची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र लस घेतल्यानंतर विषाणूची बाधा झाल्यास त्याचा गंभीर संसर्ग होत नाही. त्यामुळे सर्वांनी करोना प्रतिबंधात्मक लस घेणे गरजेचे आहे.