कल्याण (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
केंद्र सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयातर्फे राष्ट्रहित साधणारे सामाजिक कार्य करणा-या देशभरातील निवडक युवकांना दरवर्षी राष्ट्रीय युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणण्याचे कार्य करणा-या चेतन परदेशी याच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारतर्फे नुकताच नवी दिल्ली येथे त्यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चेतन परदेशी यांना केंद्र सरकारकडून मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याचा कल्याण येथे सन्मान करण्यात आला. विविधोपयोगी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सेवानिवृत पोलिस उपनिरीक्षक ‘पपी नाना’ उर्फ राजेंद्र पांडुरंग परदेशी हे होते. व्यासपीठावर भटके विमुक्त आघाडीचे गिरीष परदेशी हे होते. राहुल परदेशी यांनी चेतन परदेशी याच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. त्यानंतर शाल, पुष्पगुच्छ व अहिल्यादेवींची प्रतिमा देऊन उपस्थितांतर्फे चेतन परदेशी याचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना चेतन परदेशी यांनी देशातील प्रत्येक मूल शाळेत आले पाहिजे, ते शिकले पाहिजे व ते टिकले पाहिजे यासाठी आपल्या एस फॉर स्कूल या संस्थेमार्फत कार्यरत राहणार असल्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल परदेशी यांनी केले. चेतनच्या या कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन अध्यक्षांनी सर्वांच्या वतीने दिले. ओबीसी मोर्चा सहसंघटक योगेश परदेशी यांनीही चेतन यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संदेश परदेशी, महेंद्र परदेशी, आशिष परदेशी, रोशन परदेशी, प्रविण परदेशी, जयेश परदेशी, निखिल परदेशी, तन्मय गढरी यांनी परीश्रम घेतले. राहुल परदेशी यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.