कल्याण (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
कल्याण पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या जि. प. शाळा उसरघर या शाळेतील प्राथमिक शिक्षक राहुल छबिलाल परदेशी यांना नवी दिल्ली येथील एकेएस एज्युकेशन या संस्थेतर्फे ग्लोबल टीचर ॲवार्ड जाहीर करण्यात आला आहे.
एकेएस एज्युकेशन ॲवार्ड या संस्थेतर्फे देशभरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची माहिती गोळा करून त्यातील काही शिक्षकांना ग्लोबल टीचर ॲवार्ड देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. त्यानुसार यावर्षी देखील संस्थेतर्फे भारतातील शिक्षकांची माहिती मागविण्यात आली होती. या मिळालेल्या माहितीनुसार संस्थेने सदर शिक्षकांबाबत अन्य शिक्षकांकडून अभिप्राय मागविले होते व ज्या शिक्षकांबाबत अनुकूल असे अभिप्राय येतात त्याच शिक्षकांना सन्मानित करण्यात येते.
राहुल परदेशी हे ठाणे जिल्हा परिषदेच्या जि. प. प्राथमिक शाळा उसरघर या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य करीत असून ते उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक म्हणून ओळखले जातात. जि. प. शाळा उसरघर ही आयएसओ असलेली कल्याण तालुक्यातील एकमेव शाळा असून सर्व सुविधांनी युक्त अशी शाळा आहे. राहुल परदेशी यांनी या शाळेत डिजिटल लायब्ररी हा अभिनव उपक्रम राबविला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. त्यांच्या या उपक्रमांची दखल घेऊन त्यांना ग्लोबल टीचर ॲवार्ड जाहीर करण्यात आला आहे.
नवी दिल्ली येथील एकेएस एज्युकेशन ही संस्था शिक्षणक्षेत्रातील नावाजलेली संस्था म्हणून परिचित आहे. या संस्थेतर्फे भारतभरातील शिक्षकांना ग्लोबल टीचर ॲवार्ड देऊन गौरविण्यात येते. हा पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ यासोबतच सन्मानचिन्ह यांचे वितरण नवी दिल्ली येथील पंचतारांकित सभागृहात करण्यात येते. येत्या ४ नोव्हेंबर २०२३ रोजी हॉटेल ताज विवांता, द्वारका, नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे. राहुल परदेशी यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.