Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र PCMC : बदलत्या तंत्रज्ञानासोबत भाषाशुद्धी व माध्यम साक्षरता गरजेची ; माध्यम संवाद परिषदेत मान्यवरांचा सूर

PCMC : बदलत्या तंत्रज्ञानासोबत भाषाशुद्धी व माध्यम साक्षरता गरजेची ; माध्यम संवाद परिषदेत मान्यवरांचा सूर

0
PCMC : बदलत्या तंत्रज्ञानासोबत भाषाशुद्धी व माध्यम साक्षरता गरजेची ; माध्यम संवाद परिषदेत मान्यवरांचा सूर

पिंपरी-चिंचवड (दि.१७ प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

Madhyam Samvad Kendra Pimpri Chinchwad : प्रसारमाध्यमांच्या प्रदीर्घ प्रवासात, आधुनिक तंत्रज्ञानामुळे माध्यमांची व्याप्ती प्रचंड वेगाने वाढत आहे अशावेळी प्रत्येक माध्यमांनी आपली विश्वासार्हता जपून समाजप्रबोधनास प्राधान्य द्यावे. कुठल्याही माध्यमाचा सद्सद्विवेक बुद्धीने वापर झाल्यास प्रत्येक माध्यम समाजजागृतीसाठी उपयोगी ठरेल, असे मत विश्व संवाद केंद्र, पुणे व पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ ९०.४ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माध्यम संवाद परिषदे’त प्रमुख सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड शहरातील माध्यमकर्मी व संबंधित अभ्यासकांचा परस्पर परिचय, संवाद व्हावा, माध्यमांतून सकारात्मकता वाढीस लागावी, या हेतूने ‘बदलते तंत्रज्ञान, माध्यमे आणि समाज’ परिसंवादाचे आयोजन शनिवार दि.१४ ऑक्टोबर रोजी निगडी प्राधिकरण येथील पी.सी.ई.टीतील बिझनेस स्कूल सभागृहात करण्यात आले होते.

याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पत्रकारिता विभाग प्रमुख प्रा.डॉ.संजय तांबट, सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते व शिवकालीन युद्धकला प्रशिक्षक प्रद्योत पेंढारकर तसेच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओचे निवेदक विराज सवाई या मान्यवरांनी आपले विचार मांडले. भारतमाता प्रतिमा पूजन तसेच अनिरुद्ध सराफ व संच यांच्या सुमधुर बासरी वादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे विश्व संवाद केंद्राचे कार्यवाह नितीन देशपांडे यांनी तर सारंग पापळकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. आयोजकांतर्फे मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर प्रमुख वक्ते डॉ.संजय तांबट यांनी बदलत्या तंत्रज्ञानानुरुप माध्यमांची वाढलेली व्याप्ती, छपाई यंत्रापासून तर वेब पोर्टल, रिल्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंतचा प्रवास याबरोबरच भाषाशुद्धी, माध्यम साक्षरता यावर विशेष प्रकाश टाकला. चित्रपट क्षेत्रातील आव्हाने, नवनवीन तंत्रज्ञान याविषयी प्रद्योत पेंढारकर यांनी तर आकाशवाणी या सर्वात जुन्या व आता आलेल्या नव्या स्वरूपातील रेडिओ विषयी विराज सवाई यांनी विवेचन करून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट मध्ये सुरू झालेल्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ बद्दल माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनी आपले अनुभव, माहिती तसेच विविध उदाहरणांवरून माध्यमांतील स्थित्यंतरे, समाजमाध्यमांचा प्रभाव, माध्यमांतील आव्हाने याविषयावर मंथन करून सत्य व राष्ट्रीय विचारांना पूरक समाज प्रबोधनात्मक पत्रकारितेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. सुमारे २ तास चाललेल्या या परिसंवादात माध्यमकर्मी उस्फूर्तपणे सहभागी झाले. मान्यवरांना बोलते करण्याचे काम संवादक डॉ.सुचेत गवई यांनी केले.

देवाशिष सहस्रबुद्धे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शहरातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स, न्यूज वेब पोर्टलचे संपादक, पत्रकार, व्याख्याते, लेखक, पत्रकारितेतील विद्यार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला पी.सि.ई.टी ट्रस्ट व कार्यकारी संचालक डॉ.गिरीश देसाई, अजिंक्य काळभोर यांचे सहकार्य लाभले. वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here