हायलाइट्स:
- ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र कसे बाहेर आले, असे वक्तव्य पाटील यांनी केले होते. त्यावर अजित पवार यांनी पलटवार केला आहे.
- जी गोष्ट झालेली आहे तिला चौदा महिने झाले आहे. मागची गोष्ट उकरून काढताय, ज्यांना काम नाही ते नको त्या गोष्टी बोलतात- अजित पवार.
- राज्यात करोनाचे संकट असून त्याकडे लक्ष देणे आता महत्वाचे आहे- अजित पवार.
पुणे: (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलेआहे. ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र कसे बाहेर आले, असे वक्तव्य पाटील यांनी केले होते. त्यावर अजित पवार यांनी पलटवार केला आहे. जी गोष्ट झालेली आहे तिला चौदा महिने झाले आहे. मागची गोष्ट उकरून काढताय, ज्यांना काम नाही ते नको त्या गोष्टी बोलतात. राज्यात करोनाचे संकट असून त्याकडे लक्ष देणे आता महत्वाचे आहे, अशा शब्दात पवार यांनी पाटील यांना उत्तर दिले आहे.
‘त्यांचा आवाका किती आम्हाला माहीत आहे’
नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यावर ते म्हणालेत की, काही काही जण भावनेच्या आहारी जाऊन काहीही बोलतात. कायदा, संविधान काहीही बघत नाही. म्हणून ती बातमी चालते. ही लोक काही काळ आमच्या बरोबर होती. त्यांचा आवाका किती आहे. हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे फार महत्व देत नाही असा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे.
‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच आमची भूमिका’
कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. या मुद्द्यावर आम्ही राज्यपालांना भेटलो असून वरिष्ठांना देखील भेटणार असल्याचे पवार म्हणाले. कोर्टाने जे ग्राह्य धरलं, त्यानुसार साकल्याने विचार केला जाणार असून माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले, आणि सदस्य यांचे मत घेऊन आम्ही मार्ग काढत आहोत, असे पवार यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- रायगडावरुन संभाजीराजेंची आंदोलनाची हाक; १६ जूनला पहिला मोर्चा काढणार
मराठा आरक्षणासंदर्भात सरकारबाबत काही जण काहीही वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. या सरकारला मराठा आरक्षण टिकवता आलं नाही असं म्हणत आहेत. मात्र आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे अजित पवार म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- मुंबईत लग्नसोहळ्यासाठी ५० जणांना परवानगी; ‘हे’ आहेत नवे नियम
संभाजीराजेच्या नियोजित आंदोलनाच्या भूमिकेवर देखील पवार यांनी भाष्य केले आहे. त्यावर ते म्हणाले की, मी त्यांच्याशी बोललो होतो. पण त्यांनी सांगितलं की, ६ तारखेचा कार्यक्रम होऊ द्या. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या मागण्या मांडल्या आहे. आता महाविकास आघाडी सरकार त्यावर लवकरच निर्णय घेईल.
क्लिक करा आणि वाचा- पुणे जिल्ह्यात काय सुरु, काय बंद?; जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले सुधारित आदेश
‘कर कपात शक्य नाही’
पेट्रोल, डिझेलचे दर १०० रुपयांच्या वर पोहोचले आहे, त्यामुळे राज्यसरकारला कर कमी करण्याची मागणी होत आहे, परंतु गेल्या वर्षांपासून आपण कोरोनाशी लढत आहोत, त्यामुळे करामध्ये कपात करता येणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. केंद्राची परिस्थिती आत्ता चांगली असल्याचेही ते म्हणाले.