पिंपरी चिंचवडमध्ये होणार श्रीरामनामाचा भव्य जागर; श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त नागरिकांत उत्साह

0
38

पिंपरी-चिंचवड, दि.२२ (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी बहुप्रतीक्षित श्रीराम मंदिराचे लोकार्पण होणार आहे, यानिमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून पिंपरी चिंचवडकर नागरिक देखील या भव्य दिव्य सोहळ्याचे शहरात विविध कार्यक्रम, उपक्रमांद्वारे जल्लोषात स्वागत करणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे पुणे विभाग मंत्री नितीन वाटकर यांनी दिली आहे.

या संदर्भात नुकतीच निगडी प्राधिकरण येथील सावरकर सदन येथे शहरातील विविध सामाजिक ,अध्यात्मिक – सांस्कृतिक, सेवाभावी, विविध ज्ञाती संस्था, सार्वजनिक उत्सव मंडळे, राजकीय पक्ष, संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल, विश्व हिंदू परिषदेचे शहर अध्यक्ष शरद इनामदार, पुणे विभाग मंत्री नितीन वाटकर प्रामुख्याने उपस्थित होते.

अयोध्येत मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी सर्व भाविकांना उपस्थित राहणे शक्य नसल्याने ‘माझे गाव माझी अयोध्या’ या संकल्पनेनुसार सकल हिंदू समाज भाविकांनी आपल्या परिसरात, घरीदारी धार्मिक अनुष्ठान, नामसंकीर्तन करीत स्थानिक मंदिरात आरती, प्रसाद वितरण करून लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर दाखवून आनंदोत्सव साजरा करावा यानिमित्त परिसरात रांगोळ्या, घरांवर भगवे ध्वज आणि पताका लावून परिसर सुशोभित करावा, सायंकाळी घरांसमोर किमान पाच दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे.

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांची, रामलला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येला राममंदिरात होणार आहे. त्याआधी शहरातील घरोघरी दि.१ ते १५ जानेवारी २०२४ या दरम्यान अयोध्येवरून आलेल्या पवित्र अक्षता देऊन निमंत्रण देण्यात येणार आहे. २२ जानेवारी २०२४ ला मंदिर केंद्रित कार्यक्रम शहरातील सर्व भागात होणार असून पिंपरी चिंचवड मधील सर्व रामभक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. शहरातील सर्वच सामाजिक, अध्यात्मिक-सांस्कृतिक क्षेत्रातील संस्था – संघटना, राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम, उपक्रमाचे आयोजन करणार असल्याचे संस्थांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

बैठकीचे प्रास्ताविक विश्व हिंदू परिषदेचे नितीन वाटकर यांनी तर रा.स्व.संघाचे जिल्हा कार्यवाह महेश्वर मराठे यांनी समारोप केला. बैठकीला शहरातील विविध संस्था संघटनांचे जवळपास २५० प्रतिनिधी उपस्थित होते.